गौतम बुद्ध: आद्य मानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशक

 दुःख मुक्तीचा मार्ग

एकदा गौतम बुद्ध धम्मदेसना देण्यासाठी एका ठिकाणी थांबले होते. लोक त्यांना विविध प्रकारचे प्रश्न विचारत होते आणि बुद्ध त्यांना उत्तर देत होते. तिथे एका कोपऱ्यात एक माणूस शांत बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर वेदनेचे भाव स्पष्ट दिसत होते. बुद्धांनी त्या माणसाला विचारले, "हे मानवा, तुला काय त्रास होत आहे?" त्या व्यक्तीने थोडक्यात उत्तर दिले, "मला माहित नाही." बुद्ध म्हणाले “त्याच्या मुळापर्यंत जाऊन त्याकडे लक्ष दे मग त्यावर उपचार कर”. त्या माणसाने बुद्धांना विचारले, “ते कसे करायचे? "

गौतम बुद्ध म्हणाले, जवळच्या जंगलात जा आणि तेथून काही रोपे घेऊन ये. परंतु हे लक्षात ठेव की रोपे अशी असावीत की केवळ दोन ते चार पाने आलेली आणि सर्व झाडे वेगवेगळी असावीत. तो मनुष्य जंगलात गेला आणि बुद्धांच्या सूचनेनुसार काही झाडे उखडून आणली. गौतम बुद्धांनी त्याच्या हातातून एक वनस्पती घेतली आणि ती त्यास दाखवली आणि विचारले की ही कोणती वनस्पती आहे? त्या व्यक्तीने सांगितले की ही एक अतिशय लहान वनस्पती आहे. त्याची पानेही खूप लहान आहेत, म्हणून ती कोणती वनस्पती आहे हे सांगणे त्यास फार अवघड आहे. गौतम बुद्ध म्हणाले की या वनस्पतीच्या मुळाकडे लक्षपूर्वक पाहा आणि तेथे काय आहे ते सांग? त्या व्यक्तीने मुळ्यांकडे काळजीपूर्वक पाहिले आणि म्हटले की वनस्पतीच्या बियाणांची टरफले त्या वनस्पतीच्या मुळांना चिकटलेले आहेत. यावरून हे असे सूचित करते की हे एक कडूलिंबाचे रोप असावे. आता जेव्हा बुद्धांनी त्याला इतर वनस्पतींबद्दल विचारले तेव्हा त्यांनी मुळांकडे पाहिले आणि सर्व वनस्पतींची योग्य नावे सांगितली.

गौतम बुद्धांनी त्याला समजावून सांगितले की प्रत्येक वनस्पतीला जसे बीज असते तसेच प्रत्येक दु:खाचेही बीज असते. आपण त्या बियाण्याला कारण म्हणू शकतो. कारणाशिवाय कार्य अशक्य आहे. कोणतेही रोप बियाण्याशिवाय वाढत नाही आणि कोणतेही दु:ख कारणाशिवाय उद्भवत नाही. केवळ बियाणे किंवा दु:खाचे कारण ओळखूनच आपण त्यावर उपाय करू शकतो. आधुनिक वैद्यकीय यंत्रणेमध्येही एखाद्या रोगावर उपचार करण्यासाठी रोगाचे योग्य निदान करणे अनिवार्य असते. रोगाचे नेमके कारण आणि रोगाचे नेमके प्रकार जाणून न घेता उपचार करणे हवेत बाण मारण्यासारखेच आहे. मग ते शारीरिक असो किंवा मानसिक, त्याचे मूळ शोधणे आवश्यक आहे.

आता कारण शोधल्यानंतर दु:खावर उपचार काय करायला हवे? दुःख निवारण्यासाठी बुद्धांनी चार आर्यसत्य सांगितले आहेत. ते म्हणाले की दु:ख हे जीवनाचे एकमेव सत्य आहे. हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात येते. यानंतर ते म्हणाले की जर दु:ख असेल तर नक्कीच त्याचे एक कारण आहे. विनाकारण दु:ख असू शकत नाही. मग म्हणाले की दु:खावर उपाय देखील आहेत. आता दु:खावर उपाय काय आहेत?

गौतम बुद्ध म्हणाले की सम्यक मार्ग हा दुःख निवारण्यासाठी खरा उपाय आहे. हेच बुद्धांचे तत्त्वज्ञान आहे. बुद्धांचा अष्टांग मार्ग हा त्यांच्या तत्त्वज्ञानाचा भाग आहे. दुःख निवारण करण्यास याचे पालन करणे आवश्यक आहे. आता हा सम्यकमार्ग कोणता आहे? जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात, कोणत्याही प्रकाराचे अतिरेक टाळणे आणि मध्यम मार्ग स्वीकारणे म्हणजे बुद्धांचा अष्टांग मार्ग किंवा सम्यक मार्ग होय.

गौतम बुद्धांनी सांगितलेला अष्टांग मार्ग:

गौतम बुद्धांनी अष्टांग मार्गाचा उपदेश केला. बौद्ध अनुयायी निर्वाण प्राप्तीसाठी या मार्गाचे अनुसरण करतात. बुद्धांनी सांगितलेल्या या 8 मार्गांचे तीन विभाग करता येतील अ. सम्यक वाचा, कर्मांत व आजीव यांचा नैतिक आचारणाशी किंवा शिलाशी संबंध आहे. ब. सम्यक व्यायाम, स्मृती व समाधी यांचा मनाच्या जडणघडणीशी किंवा अनुशासनाशी संबंध आहे. क. सम्यक दृष्टी व संकल्प यांचा संबंध स्वजाणिवेशी आहे असे म्हणता येईल. अष्टांग मार्गाचे घटक आणि स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे:

1. सम्यक दृष्टि:

चार आर्य सत्यांवर विश्वास ठेवणे, हिंसा, चोरी, व्यभिचार न करणे यास योग्य शारीरिक वर्तन मानले आहे. याशिवाय खोटे बोलू नये, निंदा करू नये, कठोर शब्दात बोलू नये यासाठी बुद्धाने योग्य भाषेची शिकवण दिलेली आहे. मोहापासून लांब रहावे, द्वेष करु नये यास योग्य मानसिक वर्तन म्हटले आहे. या सर्वांची जाणिव होणे म्हणजे सम्यक दृष्टी होय. जे जसे आहे तसे पाहणे यात अभिप्रेत आहे. पक्षपात, धारणा, धर्म-जात, उच्च-नीच हा भाव आपल्या दृष्टिकोनात असता कामा नये. तरच योग्य दृष्टि प्राप्त होण्यास मदत होईल.

२. सम्यक संकल्प:

केवळ राग-द्वेष विरहित मनच एकाग्र होऊ शकते. मैत्री, करुणा, समता व सदाचरण यांचा संकल्प केला पाहिजे म्हणजेच धम्माचे अनुसरण करण्याचा संकल्प केला पाहिजे. संकल्प नसलेला माणूस हा मृतवत असतो. जर आपणास दु:खापासून मुक्ती हवी असेल तर अष्टांग मार्गाचा संकल्प करणे गरजेचे आहे. मानसिक आणि नैतिक विकासाची प्रतिज्ञा म्हणजे सम्यक संकल्पाचे ध्येय होय. संकल्पाशिवाय जीवन म्हणजे अपूर्ण आहे. सम्यक संकल्पात कोणताही आविर्भाव किंवा गर्व असता कामा नये तसेच ते स्पर्धा, पैज किंवा अहंकारपोटी करू नयेत. आज अनेक पालक आपल्या मुलांसाठी अवास्तव अपेक्षा बाळगून मुलांसमोर न झेपणारे ध्येय ठेवतात. सदर ध्येय साध्य करताना मुले आणि पालक दोघेही दु:खी होतात. ध्येय साध्य झाले नाही की आत्मविश्वास ओसरून ताण येऊ लागतो. त्यातून सावरण्यासाठी सम्यक संकल्प मदत करू शकतो.       

. सम्यक वाणी

सत्य बोलण्याचा, मधुर भाषेचा सराव करणे, धम्म चर्चेचा सराव करणे हे सम्यक वाचा होय. बुद्धाचा धम्म हा माणसाला मधुर भाषेत बोलायला शिकवितो. त्यामुळे खोटे न बोलणे, इतरांना बदनाम न करणे, चाहडया न करणे, खोटेनाटे आरोप न करणे, असभ्य आणि अपशब्द न उच्चारणे यांचा समावेश सम्यक वाचा यामध्ये होतो. सम्यक वाचा याचा असाही अर्थ घेऊ शकतो की, जेवढी आवश्यकता असेल तेवढेच बोलावे अनावश्यक बोलणे टाळावे. कोणासही न मागता सल्ले देऊ नयेत किंवा कोणत्याही भांडण तंट्यात पडू नये. त्यामुळे शारीरिक, मानसिक व सामाजिक हानी होऊ शकते. त्यामुळे आपले बोलणे सत्य, सरळ आणि प्रिय असावे.

. सम्यक कर्मांत:

सम्यक कर्म हे सर्वसामान्य व व्यावहारिक स्वरूपाचे सत्कृत्य किंवा सत्कर्म नसून त्याचा संबंध कर्म करणाऱ्या कर्त्याच्या आंतरिक स्थितीशी, मनोवृत्तीशी असतो. बुद्धाच्या मते सम्यक कर्म हे शुद्ध, परिपूर्ण व अखंडित असले पाहिजे, ते शारीरिक व मानसिक दृष्टीने पूर्णपणे वर्तमानतच घडले पाहिजे. शिक्षेच्या भीतीने, कायद्याचे पालन करण्यासाठी केलेले कोणतेही कार्य सम्यक कर्म होऊ शकत नाही. आपण कोणत्याही प्राण्यास मन, काया व वाचेद्वारे हिंसा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तसेच दुराचार व भोगविलासी जीवनापासून दूर असले पाहिजे.  त्यामुळे योग्य तेच आणि योग्य तेवढेच  कर्म करणे म्हणजे सम्यक कर्मांत.

. सम्यक आजीविका :

विनाशकारी शस्त्र, जनावरे, मांस-मच्छी, मादक पदार्थ, विष, अश्लील साहित्य यांचा व्यापार व इतरांचे शोषण होईल किंवा लोकांचे नुकसान होईल असे सर्व व्यापार उपजीविकेसाठी करू नयेत. जरी आपण कितीही कठोर परिश्रम घेतले व प्रामाणिकपणे केलेले असे व्यापार उदरनिर्वाहासाठी वर्ज्य मानले आहेत. सम्यक आजीविका म्हणजे साधेपणाचे जीवन परंतु विरक्ती नव्हे. साधेपणा म्हणजे स्वामित्वाच्या भावानेपासून मुक्त असणे होय. आपली आजीविका ही आपल्या आवडीनुसार असावी. त्यापासून इतरांना त्रास, दु:ख, कष्ट, कोणतीही इजा होता कामा नये म्हणून आजीविका सन्मार्गाने असावी.  

६. सम्यक व्यायाम:

अष्टांग मार्गावर उपयोगी पडणारी मनोवृत्ती तयार करणे, अन्वेषणाची वृत्ती वाढविणे, आत्मवास्तविकीकरणाची वृद्धी करणे, मनाची शांती विकसित करणे, एकाग्रतेची सवय लावणे, समतोलपणाची समत्ववृत्ती वाढीस लावणे या गोष्टी जीवनाच्या अनेकविध चढ-उतारात प्रगती करण्यास मदत करीत असतात. अष्टांग मार्गाचे ध्येय साध्य करण्यासाठी जे प्रयत्न केले जातात तिच्या रूपाने सम्यक व्यायाम हे त्या मार्गातील अडथळे दूर करण्याचे कार्य करीत असते. वाईट विचार मनात उत्पन्न होऊ नयेत म्हणून प्रयत्न करणे म्हणजेच सम्यक व्यायाम. 

७. सम्यक स्मृती :

सम्यक स्मृती म्हणजे वस्तूंच्या वास्तविक स्वरूपाची जाणीव असणे होय. आपल्या दैनंदिन जीवनात व्यर्थ ते विसरणे आणि सार्थ ते स्मृतीत ठेवले पाहिजे. पण प्रत्यक्षात वाईट गोष्टींच्या स्मृती अधिक पक्क्या होतात त्यामुळे दु:ख निर्माण होते. कोणी आपल्यासाठी जे चांगले केलेले आहे ते लक्षात राहात नाही पण काय केले नाही तेवढेच मात्र लक्षात राहते. त्यामुळे दैनंदिन जीवन हे दु:खमय बनते. आपल्या शरीरमनातील सुखदु:खादींचे साक्षीभावनेने अवलोकन करून त्याचे स्वरूप समजावून घेणे महत्वाचे असते. त्याबाबत आपले  मन सावध, जागृत व संतुलित असणे म्हणजे सम्यक स्मृती होय. तसेच आपल्या शारीरिक आणि मानसिक वेदानांप्रति सजग (mindfulness) राहणे आवश्यक असते.

. सम्यक समाधी:

सम्यक समाधी ही खऱ्याखुऱ्या आत्मवास्तविकीकरणाने मिळत असते कारण तिच्याद्वारे आपण सम्यक जीवन जगण्याचा मार्गावर प्रवास करू लागतो. जीवनात सर्व अनित्य, क्षणिक, परिवर्तनशील असल्याने कशाशीही एकरूप न होता पूर्णपणे अलिप्ततेची दृष्टी विकसित करून तशी भावना हृदयात खेळवून शून्यतेचा खराखुरा अनुभव म्हणजे सम्यक समाधी होय हाच मार्ग आपणास निर्वाणात विलीन करतो. या घटकांचे शब्दशः पालन केल्याने आयुष्य सुखी होईल, निर्वाणाची व आनंदाची परमोच्च अवस्था प्राप्त होईल. 

गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान हे सर्वव्यापी व सर्वकालिक आहे. दुःखाचे कारण आणि त्यावरील उपाययोजना म्हणून अष्टांगिक मार्ग सांगितला. दुःख नष्ट करता येते, हा प्रयत्नवाद बुद्धांनी सांगितला म्हणून बुद्ध प्रयत्नवादी होते. बुद्ध हे बुद्धिप्रामाण्यवादी होते, कारण घडणाऱ्या घटनांमागे शास्त्रीय कारण आहे, चमत्कार नाही असे निसर्गामध्ये घडणाऱ्या घटनांचे शास्त्रीय विश्लेषण करणारे जगातील पहिले शास्त्रज्ञ म्हणजे बुद्ध. बुद्धांचे विचार, तत्त्वज्ञान आणि कार्य हे भोंगळ चमत्कारावर नव्हे, तर शास्त्रीय ज्ञानावर आधारलेले आहे. बुद्धांनी सर्वच विषमतेचा कडाडून विरोध केला. त्यामुळे मानवाने भेदभाव पाळणे निसर्गविरोधी आहे, असाच बुद्धांच्या विचारांचा मथितार्थ आहे. आज जगभर वंश, जात, धर्मावरून संघर्ष सुरू आहे, विषमतेने मने दुभंगलेली आहेत, वर्चस्वासाठी हिंसा घडत आहेत. हे थांबविण्यासाठी बुद्धांच्या समतावादी विचारांची जगाला आज खरी गरज आहे. कारण ते पहिले मानसशास्त्रज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञ होते आणि आजही ठामपणे उभे आहेत.


Comments

  1. आजच्या पिढीसाठी अतिशय उपयुक्त ठरणारी माहिती👌

    ReplyDelete
  2. सोप्या भाषेत उत्तम मांडणी

    ReplyDelete
  3. अप्रतिम आणि सोप्या भाषेत मांडणी केली आहे. आणि हे विचार आजच्या काळाची गरज आहे.

    ReplyDelete
  4. सुंदर मांडणी

    ReplyDelete

Post a Comment